पुणे : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोला साष्टांग दंडवत करत एक फेसबुक पोस्ट केली आहे. साहेब मला माफ करा … असं म्हणत वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
त्यांच्या राजीनाम्यामुळे पुणे शहरातील मनसेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला? ते कशामुळे नाराज होते? अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.
म्हणून सोडली मनसे वसंत मोरे यांनी सांगितलं कारण?
दरम्यान, वसंत मोरे यांनी स्वत: मनसे सोडण्याचं कारण सांगितलं आहे. पक्षामधील अंतर्गत गोष्टीवरून मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होतो. याबाबत शहरातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे माझं नावही सूचवलं होतं. मात्र, वारंवार गैरसमज पसवून माझ्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे, असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता तुम्ही कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला असता, सध्या मी मनसेला सोडचिठ्ठी दिली असून कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.