पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेले वसंत मोरे यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. मनसेतून राजीनामा देऊन वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र मविआकडून उमेदवारीबाबत नकार मिळाल्याने वसंत मोरे यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीची वाट धरली. यानंतर वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली. या चर्चेवर 2 एप्रिलला शिक्कामोर्तब झाला आणि वसंत मोरेंना पुण्यातून अधिकृत उमेदवारी वंचितकडून जाहीर झाली.
दरम्यान, वसंत मोरे हे मनसेचे फायरब्रँड नेते होते. गेली पंधरा वर्ष ते पुणे शहरातील कात्रज भागातून नगरसेवक म्हणून निवडून येतात. त्यांच्यावर मनसेच्या शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी दिली होती. मात्र मनसेच्या मस्जिदीवरील अनधिकृत भोंगे हटाव मोहिमेला मोरे यांनी उघडपणे विरोध नोंदवला. त्यामुळे तातडीने वसंत मोरे यांची मनसेच्या शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतरही वसंत मोरे मनसेत राहिले होते.