पुणे : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मंगळवारी (ता.09) ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन वसंत मोरे हे मातोश्रीवर पोहोचले. त्यावेळी वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो. याचा अनुभव घेऊन तुम्ही परिपक्व होऊन आला आहात. त्यामुळे मी तुम्हाला आता एक शिक्षा सुनावणार आहे. असं म्हणत यावेळी उपस्थित असलेल्यांना शिक्षा द्यायची का? असं विचारण्यात आलं. त्यावर सर्वांनी ‘हो’ म्हणाले.
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या सगळ्यांनी ही शिक्षा देतो की तुम्ही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी शिवसेना वाढीसाठी काम केलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. तसेच काम करुन दाखवा, मी पुण्यात मोठा मेळावा घेतो.
मागील आठवड्यात वसंत मोरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. वसंत मोरे या आधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करत असल्याची माहिती मिळत आहे. वसंत मोरे यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याने पुण्यात ठाकरे गटाची ताकदही वाढणार आहे.