पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. यावेळी वसंत मोरे म्हणाले, ज्यांनी देशाचं वाटोळं केलं त्या भारतीय जनता पार्टीचे विरोधात ही निवडणूक असणार आहे. मी कधीही नुरा कुस्ती केली नाही. आता मी चितपट मारणार आणि शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी विकासाच्या मार्गावर चालणारा कार्यकर्ता आहे, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी होतो तरी तेव्हा सुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला हे संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्राने पाहिलेले आहे. माझा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न होता, तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे. पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा प्रचाराचा पहिला मुद्दा असेल. पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाच कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाहतूक या विषयावरती करेल, असंही मोरे म्हणाले.
संघर्षातून मी यशस्वी होणार
चार वर्षे पूर्ण कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला विकासकाम काही नवीन नाही. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यामुळे मला वाटते की संघर्ष करत राहायला पाहिजे आणि मी तो करत राहणार आणि या संघर्षातून मी यशस्वी होणार.