राहुलकुमार अवचट
यवत : वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य सरकारची मान्यता मिळाल्याची माहिती दौंड तालुक्याचे आरोग्यदूत आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली.
या वेळी माहिती देताना आमदार ॲड. कुल म्हणाले की, विधानसभा सभागृहात २५ जून २०१९ रोजी मौजे वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याबाबत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेवेळी उत्तर देताना तत्कालीन आरोग्य राज्यमंत्र्यांनी “विशेष बाब” म्हणून वरवंड येथे ग्रामीण रुग्णालय स्थापनेस मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाप्रमाणे दौंड तालुक्यातील वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली असून, लवकरच हे रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होऊन नागरिकांना देखील याचा लाभ होणार आहे.
या रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी आमदार ॲड. राहुल कुल यांनी सांगितले. तसेच यासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार ॲड. राहुल कुल यांनी आभार मानले.
वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाटस येथे सुरु करणार
तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आमदार ॲड. राहुल कुल प्रयत्नशील आहेत. दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन केले असून, सुमारे ३६ कोटी रुपयांच्या सुसज्ज इमारतीचे काम सुरु आहे. वरवंड येथे ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याने वरवंड या ठिकाणी सध्या सुरु असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पाटस, ता. दौंड येथे स्थानांतरीत करून त्याठिकाणी आरोग्य उपकेंद्राच्या जागी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणार असल्याची माहिती आमदार ॲड. राहुल कुल यांनी या वेळी दिली.