संतोष पवार
पळसदेव: राज्यातील शालेय स्तरावरील असणाऱ्या समित्यांची संख्या आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत.
शाळा स्तरावरील कार्यान्वित असलेल्या 12 समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
शाळास्तरावरील समित्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, शिक्षक पालक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, स्क्वॉफ स्वयंमूल्यांकन समिती या समित्यांचा समावेश शाळा व्यवस्थापन समितीमध्ये, तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समितीचे विलीनीकरण विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये केले आहे.