-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय कामकाज व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, पळसनाथ विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी दिली.
वाढदिवसाच्या निमित्ताने पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यालयातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील सुमारे 250 विद्यार्थ्यांना उपयोगी शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मैदानावर उपयोगी व औषधी गुणधर्म असलेल्या वड, पिंपळ, करंज, पळस यासारख्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामपंचायत पळसदेव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे म्हणाले की, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यालयासाठी विविध भौतिक शैक्षणिक सुविधा, इमारतनिधी, विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून भरीव मदत केलेली आहे. त्यांच्या योगदानातुनच पळसदेव सारख्या ग्रामीण भागातही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम शिक्षण संस्था करीत आहे. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण, शालेय साहित्य, खाऊ वाटप, रक्तदान शिबीर आदि विधायक उपक्रम राबवले जातात.
यावेळी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, पळसदेवचे सरपंच अंकुशराव जाधव, सचिव योगीराज काळे, खजिनदार बबन काळे, माजी सरपंच आजिनाथ पवार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, स्वप्निल काळे, विकास शिंदे, मल्हारी काळे, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, संतोष पवार, अमोल रणसिंग आदिंसह शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी उपस्थित होते.