राहुलकुमार अवचट
यवत : ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला…’ असे म्हणत संक्रांतीला तिळगुळाचे वाटप करण्यासोबतच सुवासिनींना वाण वाटण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रांतीच्या गोडव्यात अधिक भर पडते. कामगार महिलांची संक्रांत गोड व्हावी, यासाठी चौफुला परिसरातील १०० वीटभट्टी कामगार महिलांना साड्यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली.
मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनी नटून-थटून एकमेकींना वाण देऊन हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, पालावर राहणाऱ्या श्रमिक महिलांना संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा कधी अनुभवायला मिळणार… कामगार महिलांची व्यथा जाणून केडगाव व चौफुला परिसरातील विविध सामाजिक संस्थांकडून दरवर्षी अनोख्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात येते.
मकर संक्रांतीनिमित्त चौफुला परिसरातील १०० वीटभट्टी महिला कामगारांना वाण म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. गेली तीन वर्षे झाली हा उपक्रम केडगाव परिसरामध्ये राबविला जात आहे. यामध्ये एक हात मदतीचा, कैलासवासी महेंद्र हरिश्चंद्र येळे यांच्या स्मरणार्थ, वेदिका फाउंडेशन केडगाव तसेच केडगाव स्टेशन येथील महिला उद्योग समूह यांच्या वतीने चौफुला येथील श्री बोरमलनाथ मंदिर परिसरात या अनोख्या मकर संक्रांतीचे आयोजन करण्यात आले होते.
‘एक हात मदतीचा’ या व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून या उपक्रमासाठी आर्थिक मदत गोळा करण्यात येते. या ग्रुपच्या माध्यमातून गोर-गरीब मुलांना शालेय साहित्याची मदत करण्यात येते. अनोख्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी केल्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व सामाजिक संस्थांचे नागरिकांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला धनराज मासाळ, शबनम डफेदार, हरिश्चंद्र येळे, जबीन ताहेर शकीलकर, अमित निंबाळकर, विकास साळुंखे, मेहक ताहेर शिकीलकर यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.