सागर जगदाळे
भिगवण : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित व सुमन रमेश तुलसानी व्ही. आय. टी. इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे संयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १८ ते २० जानेवारी दरम्यान कामशेत येथे पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन केले होते.
माध्यमिक शिक्षक गटात (इयत्ता नववी ते बारावी) ‘बेसिक कन्सेप्ट अँड लॉज’ या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी वालचंदनगर येथील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या प्रा. अरुंधती अंबिके यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. अंबिके यांचा विज्ञान प्रदर्शनातील सातत्यपूर्ण सहभाग व यशाबद्दल ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने त्यांची नोंद घेतली.
विद्यालयाच्या प्रा. अंबिके यांच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, प्राचार्य हनुमंत कुंभार, उप मुख्याध्यापक अरुण निकम, उपप्राचार्य रामनाथ नाकाडे, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे व शिवप्रसाद कुलकर्णी तसेच सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. विज्ञान प्रदर्शनातील या यशाबद्दल परिसरात विद्यालयाचे व अंबिके यांचे कौतुक होत आहे.