पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. गेल्या रविवारी (1 सप्टेंबर) हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकर यांची नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी वनराज आंदेकर यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे.
आंदेकर यांच्यावर झालेला गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याच्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना प्राथमिक वैद्यकीय परीक्षण अहवालामध्ये वनराज यांना गोळी लागली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या अंतिम शवविच्छेदन अहवालातून त्यांना दोन गोळ्या लागल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आंदेकर यांच्या गळ्यावर एक गोळी लागली होती, तर नाकावर दुसरी गोळी लागली असल्याचे तसेच त्यांच्या अंगावर कोयत्याचे 24 वार झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी(1 सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 दुचाकीवर आलेल्या टोळक्याने गोळीबार करून कोयत्याने हल्ला सुद्धा केला. या हल्ल्यामध्ये आंदेकर गंभीर जखमी झाले, आणि उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. या वेळी ससूनच्या डॉक्टरांच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये त्यांच्यावर पंधरा वार झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं.
15 नाही तर तब्बल 24 वेळा कोयत्याने वार..
वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाला परंतु, त्यांना गोळी लागली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ससून रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालात वनराज आंदेकर यांना दोन गोळ्या लागल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच, त्यांच्यावर 15 नाही तर तब्बल 24 वेळा कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना लागलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर, तर एक गोळी गळ्यावर कंठाजवळ लागल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. तर एक गोळी त्यांच्या पॅन्टवर आढळून आली आहे.