पुणे : पुण्यात रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री नाना पेठमध्ये घडली होती. या घटनेत वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील संशयितांच्या चौकशीतून पोलीसांना प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा हल्ला कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून झाला असण्याचा शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. घरगुती वादातून वनराज आंदेकर बंडु आंदेकरचा जावई आणि वनराजचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.