Vande Bharat Express : पुणे: वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या देखभाल क्षमतेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे आता मध्य रेल्वे विभागात पुणे, मुंबई (वाडीबंदर) आणि नागपूर (अजनी) येथे नव्या वंदे भारत कोचिंग डेपो उभारण्यात येणार असून, या प्रकल्पांसाठी रेल्वे बोर्डाने एकूण 4.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागांमध्ये वंदे भारत गाड्या नियमित धावत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे गाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे देखभाल डेपोंवर ताण वाढला आहे. तसेच भविष्यात आणखी वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता तांत्रिक देखभालीसाठी अतिरिक्त डेपोची गरज भासणार त्यामुळे नवे डेपो उभारण्यात येणार आहे.
या योजनेनुसार पुणे जिल्ह्यातील घोरपडी येथील विद्यमान कोचिंग आणि मेंटनन्स डेपोचे रुपांतर पूर्ण क्षमतेच्या वंदे भारत कोचिंग डेपोमध्ये केले जाणार आहे. मुंबईतील वाडीबंदर आणि नागपूरमधील अजनी कोचिंग डेपोसाठीही अशीच रूपांतरे केली जातील. घोरपडी डेपोसाठी स्वतंत्रपणे 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वंदे भारत एक्सप्रेसची देखभाल आणखी सुधारू शकते. ट्रेनच्या मेंटेनन्स प्रणालीत आणखी गती मिळेल.






