पुणे : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक येथील गवळी वस्ती येथे रविवारी (दि.10) मध्यरात्री दीडच्या सुमारास चार जणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
तसेच वाहनांची तोडफोड करण्यापूर्वी आरोपींनी दोन डिलेव्हरी बॉयला मारहाण करुन लुटले. याबाबत ओमप्रकाश देशराज सिंग (वय-26 रा. केशव कॅपीटल, जनसेबा बँकेजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 4 अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार फिर्य़ादी हे ऑर्डर डिलेव्हरी करण्यासाठी दीडच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील गवळ वस्ती येथे गेले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने फिर्य़ादी तसेच प्रथमेश परमेश्वर समुद्रे (वय-19 रा. झेड कॉर्नर, मांजरी) यांच्या दुचाकीवरुन मारुन नुकसान केले.
तसेच त्यांच्या जवळ असलेले मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले. फिर्यादी यांच्या खिशातील 660 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी फिर्यादी आणि प्रथमेश समुद्रे यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच जोरजोरात आरडा ओरडा करत वाहानांची तोडफोड करुन परिसरात दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त जगदिश सातव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस उपनिरीक्षक डि.जी. सोनटक्के यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.