पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात चौघांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. एवढच नाही तर हवेत कोयते फिरवून शतपावली करणाऱ्या एका तरुणावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात चौघांवर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यारे बाळगणे आणि दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत प्रवीण भगवान कांबळे (वय-३६, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश चंद्रकांत मोरे (वय-27), काळूराम सुखदेव लोंढे (वय-35) आणि मोनेश उर्फ वंश सोमनाथ लोंढे (वय-19, सर्व राहणार, विठ्ठल नगर, पाषाण) अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण कांबळे हे रात्री जेवण करून परिसरात शतपावली करत होते. तेव्हा चौघे हातात कोयते घेऊन जय प्रकाशनगरमध्ये घुसले. त्यांनी काही कारण नसताना रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या ४ रिक्षा, १ टेम्पो आणि २ दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीचा गोंधळ सुरू झाल्याने स्थानिक नागरिक घराबाहेर आले.
मात्र, तरुणांच्या हातात कोयते पाहून ते भितीपोटी पुढे आले नाहीत. यावेळी टोळक्याने नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यास हत्यारे हवेत फिरवली. त्याचवेळी शतपावली करणारे कांबळे याच्यांवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. येरवडा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपस पोलीस करत आहेत.