पुणे : शहर आणि परिसरात कोयता गॅंगची दहशत वाढीस लागली आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात कोयते उगारून २० ते २५ वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.
अविनाश शिंदे उर्फ सुक्या (वय २३, रा. जय जवाननगर, येरवडा) मंगेश काळोखे उर्फ घुल्या (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री सुक्या, घुल्या आणि साथीदारांनी लक्ष्मीनगर भागात कोयते, तलवारी उगारून दहशत माजविली. गुन्हेगारांच्या टोळक्याने रिक्षा, टेम्पो, मोटारी, दुचाकी अशा २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.
दरम्यान, तोडफोडीनंतर घराबाहेर पडलेल्या नागरिकांना तलवारी आणि कोयत्याचा धाक दाखविला. त्यांना शिवीगाळ करून धमकावले. टोळक्याने दहशत माजविल्याने नागरिक भयभीत झाले. पसार झालेल्या सुक्या आणि घुल्या यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सुक्या आणि घुल्या यांची धिंड काढली.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. वचक बसविण्यासाठी गुन्हेगारांची धिंड काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वाहने फोडून दहशत माजविणारा मुख्य सूत्रधार जुनेद एजाज शेख (वय २१) आणि निखिल शिंदे उर्फ बॉडी निक्या (वय १९, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.