पुणे : शहर आणि परिसरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे तसेच दहशत माजवून नागरिकांच्या मनात भिती उत्पन्न करण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलली. वाहनांची तोडफोड, जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या उपद्रवी मुलांच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड इशाराच त्यांनी दिला होता. गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आता प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात झाली आहे. पर्वती पोलीस ठाण्यात नऊ अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील दांडेकर पूल येथे नवमहाराष्ट्र परिसरात अल्पवयीन मुलांनी दहशत माजवित मोटार सायकली आणि दुचाकींची तोडफोड केली होती. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात मोटार वाहतूक कायदा, हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण ९ अल्पवयीन मुले तीन दुचाकींवरुन आली होती. या मुलांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, मुले अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तसेच मुलांकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसतानाही वाहन मालक व पालकांनी मुलांना गाड्या चालविण्यासाठी दिल्या. परिणामी या गुन्ह्यात पालकांना देखील सह आरोपी करण्यात आले आहे. या मुलांना हत्यारे देणारा लोहार भावेश दीपक चव्हाण (वय २१, रा. १०९०, अग्रसेन भवन शेजारी, रविवार पेठ) याला देखील शोध घेऊन अटक करण्यात आली आहे.
या गुन्हयात वापरलेल्या सर्व मोटारसायकल जप्त केल्या आहेत. यापुढे देखीळ तोडफोडीच्या गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर, त्यांना गुन्ह्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींवर तसेच पालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.