पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. तसेच घरात जबरदस्तीने घुसून हातातील कोयत्याने खिडक्यांच्या काचा फोडत महिलेच्या अल्पवयीन मुलीला अश्लील बोलून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी 18 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत 50 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शाहरुख उर्फ लाला शाहीद सय्यद (वय-30 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा आहे. सोमवारी रात्री फिर्यादी आणि त्यांची 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात असताना आरोपीने त्यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. यावेळी महिलेने शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने शिरुन हातातील कोयत्याने खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले.
तसेच दरवाजावर देखील कोयता मारून दहशत पसरवली. या प्रकारामुळे महिलेची अल्पवयीन मुलगी घाबरून गेली. आरोपीने मुलीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्या स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे करत आहेत.