शिरुर : वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. इंदापूरमध्ये ही भेट झाली आहे. बांदल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले आहे. वंचित बहुजन आघडी तिकीट जाहीर करण्याच्या एकदिवस आधी उमेदवार असलेले बांदल हे पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करत होते. आता मंगलदास बांदल यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी इंदापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे पुत्र प्रवीण माने यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या काही दिवसापर्यंत प्रवीण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापुरात आल्यानंतर थेट माने कुटुंबीयांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जेव्हा फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी पोहचले, तेव्हा त्या ठिकाणी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल हे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर मंगलदास बांदल यांनी सांगितले की, मी दशरथ माने यांना भेटण्यासाठी आलो होतो. नेमके त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले. तसेच आपली देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मंगलदास बांदल यांनी म्हटले आहे.
मंगलदास बांदल काय म्हणाले?
मंगलदास बांदल म्हणाले की, दशरथ माने हे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या भेटीला मी आलो तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील उपस्थित होते. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलो नाही. हा केवळ योगायोग आहे. मी स्वत: शिरुर लोकसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात वंचितने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला पाठिंबा दिला आहे आणि मी शिरुरमधून उमेदवार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचा कोणताही हेतू नाही, असं त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी कायम भाजपला मदत करत असते, असे आरोप अनेकदा वंचितवर होत असतात. त्यात अशा भेटी घडू लागल्या की, हे आरोप खरे ठरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे वंचितच्या उमेदवाराने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने वंचितचा भाजपला छुपा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.