पुणे : राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने आपले स्वतंत्र उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार वंचितने पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
मंगलदास बांदल यांनी 2009 ला विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती. त्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. तसेच ते अपक्ष उमेदवार म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल उपस्थित होते. त्यानंतर काहीच दिवसांत बांदल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.