पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या हत्येचा सर्वच स्तरावरून तीव्र निषेध केला जात आहे. एकीकडे या प्रकरणात अनेक पोलिसांसह राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याच समोर येत आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीडके कराडवर विविध 14 गुन्हे दाखल असतानाही तो परळीतील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
हे प्रकरण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलंच उचलून धरलं आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसं केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुळेंच्या याच प्रश्नाला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे?
“वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणूनच त्याला लाडकी बहीण योजनेचं अध्यक्ष पद दिलं असेल”, असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “बीडमधील हत्या प्रकरणात प्रकरणात सरकारने पुढाकार घेतला आहे. हे सरकार कारवाई करत आहे. अनेक जणांच्या चौकशीही लावल्या आहेत. या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालून आहेत. शेवटपर्यंत लक्ष देतील आणि आरोपींना शिक्षा भेटेल.”
दरम्यान, यावेळी त्यांना परळीत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराड आहे, यावर विरोधकांकडून टीका करत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले, वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला लाडकी बहीण योजनेचंअध्यक्ष पद दिलं असेल. परंतु, जर चुकीचं काम केलं असेल तर शिक्षाही होईल, असं त्यांनी यावेळी सांगितले.
माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर शिस्तभंग कारवाई?
यावेळी त्यांनी मावळ विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके विरोधात प्रचार करणारे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर आमची शिस्तभंग समिती योग्य निर्णय घेईल, असंही सांगितलं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांचं काम केल्याचंही बावनकुळे म्हणाले.