पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वडाचीवाडी (ता. हवेली) येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे.
पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी नगररचना करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या योजनांनुसार वडाचीवाडीची नगररचना केली आहे. या योजनेतील सर्व जमीन धारकांना वैयक्तिक सुनावणी दिल्यानंतर या योजनेचे कामकाज सुरु होणार आहे.
या योजनेसाठी शासन नियुक्त लवाद रवींद्र जायभाये (सहाय्यक संचालक नगर रचना दर्जा अधिकारी अधिकारी) यांनी कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे.
सुमारे १७०० खातेदार शेतकरी यांची १३१.८४ हेक्टर क्षेत्र व २.९५ हेक्टर नाल्याचे क्षेत्राचा या नगर रचना योजनेत समावेश असून त्यामध्ये ५०% क्षेत्राचे १४८ विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी ११.७२ हेक्टर क्षेत्राचे ९ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.
या योजना क्षेत्रात सुमारे १९.२२ % क्षेत्र (२५.३३ हे.आर.) रिंगरोड (९.८३ हे.) व अंतर्गत रस्ते(१५.५० हे.), मैदानांसाठी ७ भूखंड, बगीचासाठी ११ भूखंड, बालोद्यानासाठी ८ भूखंड, ग्रीन बेल्ट साठी २ भूखंड व २ खुल्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नागरी सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, शॉपिंग सेंटर या साठी देखील भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगर रचना योजनेतून ६५ मी रुंदीच्या १.५ किमी रस्त्यासाठी लागणारे सुमारे ९.८३ हे.आर क्षेत्र ताब्यात येईल.
सदरची योजनेचे लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी दि २६ जाने ते १ फेब्रु २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.