लोणी काळभोर : सहाय्यक कर्मचारी हा कोणत्याही संस्थेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असतो. हे कर्मचारी खऱ्या अर्थाने संस्थेचा गाडा हाकत असतात. असे असले तरी या कर्मचाऱ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत व त्यासाठी कायम शिकत राहण्याची वृत्ती त्यांनी अंगी जोपासायला हवी. कारण शिकत राहिल्यास आयुष्यात प्रत्येकाचा उत्कर्ष नक्की होतो, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी मांडले.
एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व दोन महिने चाललेल्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. अतुल पाटील, डॉ. मोहन मेनन, विठ्ठल चालीकवार, प्रा. श्रीकांत गुंजाळ आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मंगेश कराड पुढे म्हणाले की, १९८३ मध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी महाराष्ट्रातील पहिल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापन केली. तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की, कराड सर लावत असलेल्या छोट्याशा रोपट्याचा भविष्यात एवढा मोठा वटवृक्ष होईल. आज एमआयटी शिक्षण समुहात हजारो कर्मचारी अत्यंत निष्ठेने काम करतात. त्यांची निष्ठा व कराड कुटुंबियांवरील प्रेमामुळे भविष्यातही ‘एमआयटी’चे बाहू आणखी विस्तारत राहतील यात शंका नाही.
याप्रसंगी प्र. कुलगुरू डॉ. चक्रदेव, डॉ. चोपडे, डॉ. निलवर्ण यांनी देखील भाषण करताना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यासह वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या वेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कर्मचाऱ्याच्या सर्वांगीन विकासावर भर
एमआयटी एडीटी संकुलात कुठल्याही पदावर रुजू होणारा कर्मचारी स्वावलंबी बनेल व तो त्याच्यातील आवडी-निवडी ओळखून सातत्याने नव-नवीन कौशल्य आत्मसात करेल यासाठी आम्ही बांधील आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात शिपाई, क्लर्क, स्वच्छता कर्मचारी म्हणून रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या देखील सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले जाते, ज्यामुळे ते वैयक्तिक तसेच कार्यालयीन आयुष्यात प्रगती साधतात, असेही प्रा. डॉ. कराड या वेळी बोलताना म्हणाले.