युनूस तांबोळी
शिरूर : आठवडे बाजारात ५० मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. ग्राहकांनी व विक्रेत्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात, अन्यथा एक हजार रूपये दंड वसूल केला जाईल. त्याचप्रमाणे बाजारात अस्ताव्यस्त कचरा फेकल्यास तसेच मुख्य रस्त्यांवर गाडी लावल्यास संबंधित व्यक्ती यापुढे दंडात्मक कारवाईला पात्र ठरेल, अशी सक्ती ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी केली.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे नुकताच आठवडे बाजार लिलाव झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन हिलाळ, रितेश शहा, अविनाश पोकळे, सचिन बोऱ्हाडे, राजेंद्र इचके, गणेश जोशी, अर्जून शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आठवडे बाजारातील कर वसुलीसाठी लिलाव करण्यात आला. मारूती डांगे यांनी हा लिलाव २ लाख ३२ हजार रूपयांना घेतला. या वेळी विकास पंचरास यांनी २ लाख ३१ हजार रूपयांपर्यंत बोली लावली होती.
या वेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी वाव्हळ म्हणाले की, गुरूवारच्या दिवशी भरणाऱ्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. यामुळे कचऱ्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातून परिसरात दुर्गंधी वाढत आहे. यासाठी ग्राहक व विक्रेत्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात. विक्रेत्यांनी माल वाहतुकीसाठी आणलेल्या गाड्यांचे योग्य नियोजन करावे. मुख्य रस्त्यावर गाड्या लावू नयेत.