उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) गावातील तळवाडी व जुन्या एलाईट चौकात वाहतुकीची कोंडी होणे, ही बाब दररोजच नित्याचीच झाली असल्याने त्यात स्थानिक नागरिकांसह पुणे – सोलापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत लोणी काळभोर वाहतूक शाखा कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने, वाहतूक कोंडीत सातत्याने भर पडल्याने स्थानिकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
हडपसर ते चौफुला दरम्यान अनेक अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहणे रस्त्यावर ठिकठिकाणी उभी असतात. मात्र याकडे वाहतूक शाखा कानाडोळा करत असल्याने अनेक स्थानिक आश्चर्य व्यक्त करतात. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचा वाहतूक शाखा व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे ‘माया’वी संबंधांमुळे वहानांवर कारवाई होत नसल्याचे दिसुन येते.
सर्वसामान्य नागरिकांना लहान-लहान बाबींमध्ये देखील नियमाचा ‘बाऊ’ दाखवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस, अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल चकार शब्द ही बोलत नाहीत. त्यामुळे कारवाई तर ‘मुंगेरीलालच्या स्वप्नांसारखी’ बाब झाली आहे.
हडपसरहुन लोणी काळभोर, उरुऴी कांचन, यवतसह चौफुल्याला जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच हडपसरहुन उरुळी कांचन पर्यंत ठिकठिकाणी वर्दळ नेहमीच पहायला मिळते. हडपसरहुन लोणी काळभोरमार्गे यवत, चौफुल्याला जाण्यासाठी तीन चाकी रिक्षांपासून टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असते.
जलद वाहन मिळत असल्याने प्रवासी देखील कसालाही विचार न करता या वाहनांमध्ये बसतात. जास्त पैशांच्या हव्यासापोटी तीन चाकी रिक्षासह सहा आसनी रिक्षाचालकही आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात कोंबतात आणि जास्त फेऱ्या मारण्यासाठी भरधाव वेगाने वाहने पळवतात.
हडपसरहुन यवतकडे रोज पाचशेहुन अधिक बेकायदा प्रवाशी वहातुक करणारी वाहने धावत असुन, संबंधित वाहन चालकाकडे परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) चे फिट प्रमाणपत्र नसणे, वाहन पासिंग, वाहनांचा वीमा न करणे, चालकाकडे वाहन परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, खासगी वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अशा कित्येक प्रकारे नियमांना धाब्यावर बसवले जात आहे.
पुणे-सोलापुर महामार्गावर मागिल काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूकीचे प्रमाण वाढू लागल्याने वाहतूक पोलिस नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात वाहतूक विभागात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, ट्राफिक हवालदार व वार्डन अशी २५ ते २६ जणांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
लोणी स्टेशन चौक, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील चौकात पोलिस दिसत असले तरी, कोंडी मात्र कायम दिसते. चौकात उभे असणारे पोलिस नेमके काय काम करतात करतात, याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. नेमणूक एकीकडे तर काम दुसरीकडे केले जात असल्याने अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कुणाचाच धाक राहिला नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी पोलीस व लोकप्रतिनिधी कारवाई करत नाहीत..!
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकीत अपवाद वगळता बाराही महिने अठरा तास वाहतूक कोंडी आढळून येते. या चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा सेवारस्ता हा टपरी चालक व हातगाड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पायी चालणेही जिवावर बेतू शकते. मात्र स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी पोलीस व लोकप्रतिनिधी कारवाई करत नाही.
याबबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल म्हणाले, “स्वारगेट एस. टी. डेपो व शेवाळवाडी येथील पीएमपीएमलच्या डेपो अधिकाऱ्यांना उरुळी कांचन येथील थांबे पुढे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. तसेच जेजुरीकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने मोठी व लहान वाहने याच मार्गावरून जातात.
तसेच तरडे येथील डिझेल डेपो येथील अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. नेहमीपेक्षा जास्त वाहतूक पोलीस उरुळी कांचन परिसरातील वाहतूक सुरुळीत करण्यासाठी कार्यरत आहेत.