गणेश सुळ
केडगाव, (पुणे) : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीत प्रथम क्रमांताचा मान उरुळी कांचन येथील बाहुल्या आणि मण्या यांनी मिळवला. दुसरा क्रमांक यवत येथील आबासाहेब दोरगे याच्या जोडीला तर तिसरा क्रमांक विजय भंडलकर यांच्या बैलजोडीने मिळवला. या स्पर्थेचे उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते झाले.
या वेळी बोलताना थोरात म्हणाले की महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतींची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पहिले जाते. बैलगाडा शर्यतीमुळे देशी जनावरांचे (गाय-बैल) संगोपन चांगल्या पद्धतीने होते. महाराष्ट्रात विविध भागांत बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार असून, त्या भागात वेगवगळ्या नावाने ही शर्यत साजरी केली जाते.
या कार्यक्रमप्रसंगी बैलगाडा शर्यत शौकीनांनी ही शर्यत पहायला प्रचंड गर्दी केली होती. इतर तालुक्यांतून देखील या शर्यतीसाठी बैलगाडा मालक आणि शौकिनांनी उपस्थिती लावली होती. ज्या खुटबाव गावाच्या माळावर या शर्यतींचे आयोजन करण्यात आले, तेथे पहिल्या शर्यतीचा मान खुटबावचे सरपंच निखिल थोरात यांच्या बाहुल्या आणि मण्या यांनी मिळवला. दुसरा क्रमांक यवत येथील आबासाहेब दोरगे याच्या जोडीला तर तिसरा क्रमांक विजय भंडलकर यांच्या बैलजोडीने मिळवला. तर ज्या खुटबाव गावात या शर्यतीचे आयोजन केले होते, तेथील रमेश थोरात यांचा बादशहा व सोमा थोरात यांचा राजा या बैलजोडीने गट पास बक्षीस जिंकल्याने सर्वच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, या वेळी दादा थोरात, प्रतीक थोरात, संकेत थोरात, सूरज थोरात, अजित थोरात, ओंकार थोरात, प्रसाद थोरात, सूरज थोरात या आयोजकांनी तसेच खुटबाव गावातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शर्यती पाहायला आलेल्यांचे व सहभागी होणाऱ्या बैलगाडा मालकांचे स्वागत केले.