उरुळी कांचन, (पुणे) : राज्यात जम्बो पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून सध्याची पोलीस भरती झाल्यानंतर तात्काळ उरुळी कांचन येथील पोलीस ठाणे उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाण्याला ग्रामीण पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य तथा उरुळी कांचन येथील भाजपा नेते अजिंक्य कांचन यांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्याकडे सोमवारी (ता. २७) निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे उपस्थित होते.
यापुढे बोलताना गोयल म्हणाले, राज्य शासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. तसेच उरुळी कांचन पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी आमचेही सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर व लोणीकंद या ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाण्याच्या समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात १६ मार्च २०२१ ला करण्यात आला होता. उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून यामध्ये १ पोलीस निरिक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस हवालदार, २५ पोलीस नाईक, तर ३० पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत.
याबाबत बोलताना युवा नेते अजिंक्य कांचन म्हणाले, “लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्यावर कामाचा ताण वाढल्याने, उरुळी कांचन येथे पोलीस ठाण्याचे विभाजन व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. नागरीकरांना पोलिसांची सेवा चांगली मिळावी. ग्रामीण पोलीस ठाणे उदयास आल्यास सदर ठिकाणी मोठ्या प्रमानात पोलीस बळ मिळणार आहे. वाहतुक कोंडी व गुन्हेगारी कमी होणार याबाबत कोणातेही दुमत नाही.”