लोणी काळभोर : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची उरुळी कांचन (ता. हवेली) येथील दुपारच्या विसाव्याची सुमारे 60 वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखी थेट यवतच्या दिशेने रवाना झाली आहे. यामुळे उरुळी कांचन ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथे मंगळवारी ( ता.२ ) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुक्कामी पोहोचला होता. मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळा लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांचा निरोप घेऊन बुधवारी (ता.३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी, इनामदार वस्ती येथील ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेत पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पोहचला.
उरुळी कांचन येथे पालखी सोहळा पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा अडविला. दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात करावा, अशी विनंती पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना ग्रामस्थांनी केली. यावेळी ग्रामस्थ व पालखी सोहळा विश्वस्त यांच्यामध्ये वाद झाला. उरुळी कांचन ग्रामस्थ पालखी गावात नेण्यासाठी आक्रमक होते. तेव्हा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर पालखी सोहळा हा ठरलेल्या वेळापत्रकानुसार उरुळी कांचन येथील विसाव्याला न थांबता थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. ग्रामस्थ व पालखी सोहळ्याच्या या वादामध्ये ६० वर्षाची परंपरा मोडली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारकरी संप्रदायाच्या वैष्णवांचा मेळा हा गेल्या 339 वर्षांपासून देहू ते पंढरपूर असा चालत जातो. तो मार्गस्थ होत असताना वेगवेगळ्या गावातून, वाड्या वस्त्यांवरून जात असतो, या मार्गातील वैष्णवांना तुकाराम महाराजांबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. त्यानुसार या पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी उरुळी कांचन येथील विसाव्याच्या संदर्भात बदल केले होते. त्यामध्ये दुपारचा विसावा ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराऐवजी पालखी मार्गावरच म्हणजे पुणे-सोलापूर महामार्गावरच विसावा केला.
पालखी सोहळा सुरळीतपणे उरुळी कांचन गावात आश्रम रोडने, मारुती मंदिरात जाऊन अभिषेक पुजा व आरती स्वीकारून पुढील यवत मुक्कामासाठी महात्मा गांधी विद्यालय रस्त्याने सोलापूर रोडला लागून पुढे जात होता. मात्र, २०२३ पासून विश्वस्तांनी वेगळी भूमिका घेत उरुळी कांचन ग्रामस्थांचा शांतीपूर्ण मार्गाने सर्व सोईसुविधांयुक्त असा विसावा टाळण्याचा किंवा उरुळी कांचन वासियांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत, असा आरोप करत उरुळी कांचन ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला असहकार करण्याचा पवित्रा घेतला होता.