उरुळी कांचन, ता.२८ : कोरेगाव (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोधे-काकडे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका योगिता नागनाथ काळे (वय ५३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ गाव सोलापूर) यांचे निधन झाले. पुण्यातील बुधराणी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी (ता.२८) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
योगिता काळे या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपून शुक्रवारी घरी गेल्या होती. त्यानंतर काळे यांना दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२७) संध्याकाळी घरी असताना अचानक ‘लो ब्लड प्रेशर्स’चा त्रास होऊ लागला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना उपचारासाठी पुण्यातील बुधराणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
दरम्यान, योगिता काळे यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज रविवारी पहाटे दोन वाजता अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू असा परिवार आहे.
उरुळी कांचनसह परिसरात शोककळा
योगिता काळे या मागील ३४ वर्षापासून विद्यादानाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थी व शिक्षक प्रिय अशी त्यांची ओळख होती. अत्यंत हुशार, प्रेमळ, मनमिळावू व कार्यतत्पर असलेल्या आदर्श शिक्षिका हरपल्याने उरुळी कांचनसह परिसरात शोककळा पसरली आहे. अष्टापूर व लोणी काळभोर जिल्हा परिषद केंद्रातील शिक्षकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.