उरुळी कांचन : अज्ञात चोरटयांनी ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून एकाच ठिकाणी सलग दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील कामठे मळा येथे शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला उरुळी कांचन पोलिसांनी अरेरावीची भाषा करून तक्रार घेण्याऐवजी त्याला कटवल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. यामुळे उरुळी कांचन पोलिसांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तसेच गुन्ह्याची नोंद लवकर न घेणे, गुन्ह्याची तीव्रता कमी करणे, ते जाग्यावर मिटविण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक गंभीर प्रकरणे उरुळी कांचन पोलिसांबाबत समोर आली आहेत.
अविनाश विजय बोराडे (वय-31 रा. कामठे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे तक्रार न घेता माघारी पाठविण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बोराडे हे कामठे मळा परिसरात असलेल्या शेतात आपल्या कुटुंबासोबत घर बांधून राहत आहेत. दरम्यान, कामठे मळा वस्तीच्या परिसरात मागील दहा दिवसांपासून एकाच वेळी तीन ते चार ड्रोन आकाशात घिरट्या घालत आहेत. तर याच वस्तीवर चोरट्यांनी चोरी करण्याचा सलग दुसरा प्रयत्न केला आहे.
उरुळी कांचनपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर कामठे मळा आहे. या ठिकाणी १० ते १२ घरे तुटक अंतरावर आहेत. तेथेच अविनाश बोराडे यांचे देखील घर आहे. बोराडे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतातील घरात झोपले होते. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्री भुंकू लागली. त्यावेळी घराच्या खिडकीतून पहिले असता, आकाशात तीन ड्रोन घिरट्या मारत होते. तसेच एक चोर दरवाज्याच्या बाहेर थांबला होता. तर दुसरा चोर घरावर चढून पत्रे उचकटत होता. तेव्हा बोराडे खूप मोठा आरडाओरडा केला. त्यानंतर चोरटे पसार झाले.
याप्रकरणी अविनाश बोराडे हे चोरीचा प्रयत्न केल्याची तक्रार देण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.२२) सकाळी गेले होते. यावेळी तेथील महाशय साहेबांनी त्यांची तक्रार घेण्याऐवजी त्यांची उलटतपासणी केली. ड्रोन पाहिले का? चोर पाहिले का? चोरी झाली का? चोरी झाली नसल्याने तक्रार घेता येत नाही, असे सांगितले. त्यानंतर अविनाश बोराडे या शेतकऱ्याने आमच्या वस्तीकडे पोलिसांचे गस्त वाढवा. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच तक्रार घेणार का? असा सवाल देखील केला. मात्र, महाशय साहेबांनी आम्हाला आमचं माहिती आहे. तुम्ही तुमचे कामे करा, असे म्हणून तक्रार न घेता परत पाठविले.
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील एक महिन्यापासून ड्रोन टेहळणी करीत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तर सोरतापवाडी, कुंजीरवाडी व आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे झालेल्या सहा चोऱ्या, या ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांना आगोदरच आहे. अशातच आता मागील दहा दिवसांपासून उरुळी कांचन परिसरात नागरिकांच्या घरांवर ड्रोन घिरट्या घालत असल्याचे अनेक नागरिकांना दिसून आले आहे. त्यामुळे या घरफोड्याही ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यात ड्रोनची दहशत..
पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी आकाशात फिरणार्या ड्रोनची प्रचंड दहशत पसरली असून ग्रामीण व शहर पोलीस दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचे नागरिकांना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतरही पोलिसांनी या संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस हालचाल केलेली नसल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. पोलिसांनी हलगर्जीपणा सोडून तातडीने भयभीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर या प्रकरणाचे गूढ उकलण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांची तक्रार वेळेवर घेणे, हे पोलिसांचे कर्त्यव्य आहे. मात्र, संबंधित शेतकऱ्याची तक्रार घेण्यासाठी ज्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला आहे, त्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्याला त्वरील पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना भेटायला सांगा. त्यांची त्वरित तक्रार घेतली जाईल.
-शंकर पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस ठाणे)