उरुळी कांचन: उरुळी कांचन (ता. हवेली) शहरात दिवसेंदिवस शाळा, कॉलेज, गावाच्या परिसरात रोड रोमिओंनी धुमाकूळ घातला आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस सुटण्याच्या वेळी बुलेट, याम्हा, स्प्लेंडर, स्पोर्ट्स बाइकचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. उरुळी कांचन पोलिसांनी कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या बुलेटचालकाचा पाठलाग करून कारवाई करत बुलेट जप्त केली. उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस हवालदार अजित काळे, तात्यासाहेब करे यांनी ही कारवाई केली.
बुलेट रायडर महिला-मुलींजवळ जाऊन गाडीचा मोठ्याने आवाज काढतात, त्यामुळे मुली व महिला तसेच लहान मुले दचकतात. त्यामुळे वाद होऊन हाणामारीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यावर थेट कारवाई करावी, अशी मागणी उरुळी कांचनमधील नागरिकांनी केली आहे.
शाळा-महाविद्यालय परिसरात कर्णकर्कश हॉर्न वाजवित वाहने दामटणाऱ्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. कर्णकर्कश आवाज करत वाहने चालवणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा रोडरोमियोंची माहिती द्यावी, त्यांचे नाव गुपित ठेवले जाईल.
ज्ञानेश्वर बाजगिरे, सहायक पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस स्टेशन