लोणी काळभोर: मागील पाच दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अपघात झाला होता. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. जखमीला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बड्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमी रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर रुग्णालय असतानादेखील उरुळी कांचन पोलीस आले नाहीत. उरुळी कांचन पोलिसांच्या या अडेलतट्टू भूमिकेमुळे पाच तास मृतदेहाची हेळसांड झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गाड्यांचा अपघात झाला होता. अपघातातील जखमीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालय प्रशासनाने याबाबतची एमएलसी लोणी काळभोर पोलिसांना पाठवली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर एमएलसी घेऊन ती पुढील कार्यवाहीसाठी उरुळी कांचन पोलिसांना दिली होती. त्यानंतरही या अपघाताची अथवा अपघातातील जखमीची माहिती घेण्यासाठी उरुळी कांचन पोलीस रुग्णालयात आले नाहीत. दुर्दैवाने उपचार सुरु असताना जखमी व्यक्तीची बुधवारी (ता.6) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी उरुळी कांचन पोलीस असणे अपेक्षित होते. मात्र, रुग्णाचा मृत्यू होऊन 5 तास उलटल्यानंतरही उरुळी कांचन पोलीस आले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस येत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि आपली हकीकत सांगितली. लोणी काळभोर पोलिसांनी माणुसकी दाखवत तात्काळ रुग्णालय गाठले. त्यानंतर मृतदेहाचे उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
उरुळी कांचन पोलिसांच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णाची भेट घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर रुग्णाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणे पोलिसांचे आद्य कर्त्यव्य आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांची कोणतीही तत्परता दिसून आली नाही. याउलट पोलिसांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे 5 तास मृतदेहाची हेळसांड झाली. त्यामुळे नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
नागरिकांना मदत, सेवा व संरक्षण देणे, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, सदर अपघाताच्या घटनेत एकाही पोलीस कर्मचाऱ्याने काम करण्यासाठी तत्परता दाखवली नाही. त्यामुळे एका मृतदेहाची हेळसांड झाली आहे. यानिमत्ताने उरुळी कांचन पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.