लोणी काळभोर: उरुळी कांचन -जेजुरी राज्य महामार्गावर कार चालकाचे नियंत्रण सुटून कार नव्या कालव्यात पडल्याची धक्कादायक घटना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. 23) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिल्यानंतरही पोलीस तब्बल दीड तास उलटल्यानंतरही घटनास्थळावर आलेच नाहीत, असा आरोप शिंदवणे गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाबरोबरच एखादी घटना घडली तर त्या घटनास्थळी जाऊन त्वरित मदत करणे पोलिसांचे आद्य कर्त्यव्य आहे. मात्र दीड तासानंतरही पोलीस घटनास्थळी मदतीसाठी पोचू शकत नसतील, तर ही खूप गंभीर बाब आहे. तर या गंभीर प्रकारामुळे गृह विभागाची लक्तरे निघाली असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस असून अडचण, नसून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ येथील स्थानिक नागरिकांवर आली आहे.
अमर साहेबराव घाडगे (वय- 28, रा. जुन्नर,) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर या अपघातात गणेश संजय थोरात (वय- 22), शुभम शंकर इंगोले (वय- 21, रा. दोघेही, केसनंद, वाघोली, ता. हवेली) व आदित्य महादेव तावरे (वय- 20, रा. जुन्नर,) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर घाडगे, गणेश थोरात, शुभम इंगोले व आदित्य तावरे हे चौघेजण बकऱ्या विकण्याचा व्यवसाय करतात. हे चौघेजण गुरुवारी सकाळी फलटण येथील बाजारात बकरी खरेदी-विक्रीसाठी चालले होते. तर अमर घाडगे हा गाडी चालवित होता. तर बाकीचे तीनजण गाडीत बसले होते. उरुळी कांचन – जेजुरी राज्य महामार्गावर जात असताना त्यांची गाडी शिंदवणे येथील बेबी कालव्यावर आली असता, चालक अमर घाडगे याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार लोखंडी कठडा तोडून थेट नव्या कालव्यात पडली.
गाडी कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिक व सचिन उर्फ बाळा महाडिक कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदत करून कारमध्ये अडकलेल्या चार जणांना गाडीतून बाहेर काढले. तेव्हा कार चालक अमर घाडगे हा गंभीर जखमी झाला होता. तर गणेश थोरात, शुभम इंगोले व आदित्य तावरे हे किरकोळ जखमी झाले होते. नागरिकांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमर घाडगे याला तत्काळ एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अमर घाडगे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, शिंदवणे येथील अपघाताची माहिती काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ उरुळी कांचन पोलिसांना दिली. मात्र दीड तास उलटल्यानंतरही पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल न झाल्याने, काही नागरिकांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. उरुळी कांचन पोलीस अपघातातील जखमींना मदत करून शकत नसतील, तर पोलीस नेमकं काम करतात करी काय? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
नागरिकांना त्वरित सेवा मिळावी म्हणून उरुळी कांचन पोलीस ठाणे स्वतंत्र व्हावे, यासाठी उरुळी कांचनमधील अनेक छोट्या – मोठ्या पुढाऱ्यांनी मोठमोठ्या नेत्यांकडे मागणी केली. तब्बल दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर गृह विभागाच्यावतीने स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली व त्याचा समावेश पुणे ग्रामीण पोलीस दलात समावेश केला. त्यानंतर या पोलीस ठाण्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र, उरुळी कांचन पोलीस ठाण्यापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदवणे येथील अपघाताच्या ठिकाणी पोलीस दीड तास उलटून देखील पोहोचत नसल्याने पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे रजेवर असल्याने पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे दिलेला आहे. शिंदवणे येथील अपघाताच्या घटनास्थळी पोलीस मदत वेळेवर पोहोचणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी एवढा का उशीर झाला, हे अद्याप समजलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात जर कोण दोषी आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे)