उरुळी कांचन (पुणे) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागाने सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पत्रा वस्ती परिसरात छापे टाकून सुमारे १० लाख ५० हजार ६१० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यासह तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रल्हाद ज्ञानोबा कड, सुभाष ज्ञानोबा कड, शंकर ज्ञानोबा कड (ग्रामपंचायत सदस्य) (तिघेही रा. पत्रा वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी विशाल बाळकृष्ण कोष्टी (वय ४४, भरारी पथक मुळशी विभाग, रास्ता पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण कोष्टी हे महावितरणच्या मुळशी विभागात वीज अभियंता म्हणून कार्यरत आहेत. उरुळी कांचन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्राहकांकडून वीज बिल थकबाकी वसुली करणे, वीजचोरी शोधणे, पी. डी. ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणे, असे एक पथक कार्यरत होते.
महावितरणचे एक पथक सोरतापवाडी परिसरात गस्त घालत असताना पत्रा वस्ती येथील प्रल्हाद कड, सुभाष कड, शंकर कड हे मागील ४१ महिन्यांत (१ सप्टेंबर २०२० ते ०६ फेब्रुवारी २०२४) वरील तीनही कनेक्शनसाठी वीज चोरी करत असताना आढळून आले. या वेळी चौकशी केली असता, मागील ४१ महिन्यांत त्यांनी ५० हजार ८८३ युनिटची वीज चोरी केली असून, महावितरण कंपनीचे एकूण १० लाख ५० हजार ६१० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे उघड झाले.
दरम्यान, या प्रकरणी विशाल कोष्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.