उरुळी कांचन (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची लेखी परीक्षा बुधवारी (ता. २१) सुरू झाली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पहिला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्राचार्य भारत भोसले, केंद्र संचालक धनाजी ठाकरे, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्राचार्य भरत भोसले यांनी दिल्या. तसेच विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण ७५३ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक धनाजी ठाकरे यांनी दिली.
महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज या महाविद्यालयातील एकूण ७७३ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. यामध्ये परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेतील ३१५, वाणिज्य शाखेतील २१८, कला शाखेतील १४६, तर किमान कौशल्य या शाखेचे ५९, आयटीआयचे १५ असे एकूण ७५३ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक धनाजी ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, आजचा पहिला पेपर असल्याने पालकांनी केंद्रावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथके, मंडळ सदस्य, शासकीय अधिकारी यांच्या आकस्मित भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन येथील परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.