संदीप बोडके
पुणे: हवेली तालुक्यातील उरुळी देवाची येथील मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीला आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांना धाब्यावर बसवत फेरफार नोंदींच्या प्रक्रियेत प्रचंड अकार्यक्षमता दाखवली आहे. त्यांच्या प्रलंबित कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असून, ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट (FIFO)’ प्रणालीला त्यांनी अक्षरशः दिवे घाट दाखवला आहे.

फेरफार नोंदी दोन महिन्यांपासून प्रलंबित
मौजे वडकी येथील गट क्रमांक 977 संदर्भातील फेरफार नोंद (क्रमांक 26874) मंडल अधिकारी भोंगळे यांच्या टेबलावर तब्बल दोन महिने प्रलंबित असूनही आजतागायत ती नोंद निर्गत करण्यात आलेली नाही. संबंधित फेरफार नोंद 20 मार्च रोजी गाव दफ्तरी दाखल झाली होती, ज्याचा 15 दिवसांचा कायदेशीर कालावधी 8 एप्रिल रोजी पूर्ण झाला. त्यानंतर कोणतीही हरकत किंवा तक्रार न आल्याने नोंद त्वरित निर्गत होणे अपेक्षित होते. मात्र, नियम धाब्यावर बसवत ही नोंद अद्यापही प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ई-फेरफार नोंदी वेळेत पूर्ण करून निर्गत करण्याचे स्पष्ट आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे व नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी वेळोवेळी तालुका पातळीवरील बैठकीत मंडल अधिकारी व तलाठ्यांना सूचना केल्या होत्या. संगणकीकृत नोंदींच्या कार्यक्षमतेसाठी अहवाल-१, गट क्रमांक तपासणी, ७/१२ दुरुस्ती यावर देखील आढावा घेतला गेला. तरीही काही मंडल अधिकारी प्रोटोकॉलसाठी नोंदी लटकवत ठेवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

काही महिन्यांपूर्वी मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांनी त्यांच्या डॅश बोर्डवरील शेकडो नोंदी प्रलंबित ठेवल्या होत्या. त्यावेळी “पुणे प्राईम न्यूज” ने त्यांचा विलंबाचा कारभार जनतेपुढे व प्रशासनापुढे मांडला होता. मात्र त्यांच्यावर हवेलीचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे मंडल अधिकारी भोंगळे या प्रलंबितच्या कारभारात सुसाट सुटल्या आहेत. त्यांच्यावर दफ्तर तपासणी, शिस्तभंग कारवाई याबाबत वरिष्ठ कार्यालय प्रोटोकॉलरुपी मेहेरबान असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांच्यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय वाढली असून, त्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ
या संपूर्ण प्रकरणावर मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सलग दोन दिवस फोन उचलले नाही. तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र, महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “वडकी येथील फेरफार नोंदी डॅशबोर्डवर दिसत नाहीत. तुमच्याकडे असतील तर मला व्हाट्सॲपवर पाठवा. मी तपासून पाहतो.”







