पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येत असलेल्या रिंगरोडची भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, असा आदेश महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी दिला आहे. पीएमआरडीएच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या रिंगरोड कामाचे टप्पानिहाय नियोजन केले आहे. १२८ किलोमीटर लांबीचा रस्ता सोळू येथून सुरू होत आहे. या रस्त्याचे पीएमआरडीएकडून ८३.१२ किलोमीटर अंतरातील काम केले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे या ४.७० कि. मी. रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. ४) पीएमआरडीएच्या आकुर्डीतील कार्यालयात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी अभियांत्रिकी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सुरू कामे, भविष्यातील कामे याबाबत चर्चा केली. रिंगरस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी लवकर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
सोळू ते वडगाव शिंदे आणि पुणे-अहमदनगर रस्ता ते पुणे-सातारा रस्ता या दरम्यान ३२ किलोमीटर अंतरात देखील भूसंपादन प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेले आहे. त्याविषयी देखील बैठकीत चर्चा झाली. पीएमआरडीए हद्दीतील पर्यटनस्थळांचा विकास, विकासकामांसाठी भूसंपादन प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विकासकामांच्या ४० टेंडरबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.