पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर आल्याने चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. अशातच आता, विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरु केली. डॅा. पूजा खेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे, तसंच आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून पूजा खेडकर यांची चौकशी सुरु आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. असं असताना लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक करण्यात आली आहे. वडिल दिलीप खेडकर यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यामुळे आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.
यूपीएससीने घेतला मोठा निर्णय
पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर केली आहेत, ती बोगस असल्याचे सिद्ध झाले आहेत आहे. पूजा खेडकर 2018 पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या. मात्र, 2018 नंतर त्यांनी नाव बदलले, खोटी ओळख निर्माण करून दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. ही खोटी कागदपत्रे मिळवताना त्यांनी स्वतः ची माहिती लपवली. जेव्हा त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यानंतर अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आणि त्यानंतचर युपीएससीने मोठं पाऊल उचलत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.