-योगेश मारणे
पुणे : न्हावरे(ता.शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन, आता उपजिल्हा रुग्णालय झाले आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने न्हावरे ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धनसाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे न्हावरे येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व-सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत. पूर्वीच्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाऐवजी आता 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज आणि उत्तम प्रकारे उपलब्ध होणार आहे.
न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी न्हावरे गावचे असलेले व भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून, विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय झाले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी वाढीव जागा व नवीन पदनिर्मितीची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन आदेशही प्राप्त झाला आहे.
पंचक्रोशीतून निंबाळकर यांचे विशेष कौतुक…
न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात व्हावे, यासाठी माजी आयएएस अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्रस्ताव तयार करण्यापासून सर्व पूर्तता केली. व उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळवण्यापर्यंत शासन स्तरावर सर्व पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.