योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील पाबळ येथे काही दिवसांपुर्वी दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच इनामगाव (ता. शिरुर) येथे शेततळ्यात पोहायला गेलेली पाच शाळकरी मुलं बुडत असताना येथील उपसरपंच सुरज मचाले यांनी प्रसंगवधान राखत दाखवलेल्या धाडसामुळे ही पाच मुलं बुडताना वाचली आहेत. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या कार्यामुळे सुरज मचाले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शनिवार (दि. १५) रोजी इनामगाव येथील ओंकार किरण खरात, गौरव किरण खरात, शिवराज मनोहर कांगुने, पृथ्वीराज रविंद्र खरात, सक्षम नवनाथ खरात ही पाच शाळकरी मुलं दुपारच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. शिवराज कांगुने, सक्षम खरात, गौरव खरात हे तिघे जण पाण्यात पोहत असताना बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी ओंकार खरात आणि पृथ्वीराज खरात हे दोघेजण शेततळ्यात उतरले. परंतु या पाचही जणांना पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले.
मात्र, दैव बलवत्तर म्हणुन नेमकं याचवेळी इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले हे योगायोगाने बोअरवेलची मोटार बंद करण्यासाठी आले होते. त्यावेळी ही पाचही शाळकरी मुलं पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच त्या मुलांच्या दिशेने धाव घेत शेततळ्यात बुडणाऱ्या पाचही मुलांना वाचवत जीवदान दिले. त्यामुळे इनामगावसह पंचक्रोशीतुन सुरज मचाले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.