पुणे: जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाका दिला आहे. भोरमध्ये वादळी पावसाने आठवडे बाजार उद्ध्वस्त केला. त्यामुळे भाजीपाला भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. तसेच खेडच्या पश्चिम पट्ट्यात मागील सहा दिवसांत पाच वेळा ढगफुटीसारख्या पाऊस झाल्याने भीमा नदीला उन्हाळ्यात पूर आला. केवळ एका तासात ७४ मिमी पावसाने शेतांमधील बांध फोडले, बाजरी, कांदा, मका पिके उद्ध्वस्त केली आहेत. त्याचबरोबर शिरूर-भिमाशंकर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
भोर तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास दीड तास चाललेल्या पावसाने काही गावांना झोडपून काढले. याचा परिणाम आठवडे बाजारावर देखील झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच बाजारातील भाजीपाला भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले.
तसेच चास-कमान धरण परिसरात केवळ एका तासात ७४ मिमी पावसाची नोंद झाली, तर प्रथमच भिमा नदीला उन्हाळ्यात पूर आला. कडधे, कान्हेवाडी, कमान, पापळवाडी, बहिरवाडी, मिरजेवाडी आदी गावांमध्ये मुसळधार पावसाने ओढे-नाल्यांना पूर आला. या पुराचे पाणी शेतात शिरल्याने बांध फुटले, बाजरी, भुईमूग, कांदा, मका यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली.