पुणे : पुण्यात अपघातच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, दुसरा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बोपोडी परिसरात घडली. समाधान कोळी असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर पी. सी शिंदे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी समाधान कोळी आणि पी. सी शिंदे हे बीट मार्शल म्हणून रविवारी मध्यरात्री गस्त घालत होते. हॅरिस ब्रीज बोपोडीजवळ दोघेही दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिंदे हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल. गंभीर जखमी असलेल्या शिंदे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर समाधान कोळी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला असून सध्या पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.