दौंड(पुणे) : दौंड तालुक्यातील दापोडी येथील एकाच कुटुंबातील तिघांना विजेचा धक्का लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि.17) रोजी घडली. या घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या मुलाचा समावेश आहे. यामध्ये कुटुंबातील एकमेव मुलगी वैष्णवी ट्यूशनला गेल्याने ती बचावली आहे. या दुर्दैवी घटनेने दौंड तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे.
मृत्त व्यक्तींची नावे सुरेंद्र देविदास भालेकर (वय 44), पत्नी अदिका सुरेंद्र भालेकर (वय 38), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय 19) आहे. सकाळी 7 च्या सुमारास सुरेंद्र भालेकर आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारेचा धक्का बसला. त्यांच्या आवाजाने तत्काळ त्यांना वाचवण्यासाठी मुलगा प्रसाद हा धावून गेला, त्यावेळी त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील ही त्याठिकाणी त्यांना वाचवण्यास गेली असता ती देखील मृत्यूमुखी पडली आहे.
भालेकर हे कुटुंब सोलापूर येथील असून सध्या ते दापोडी (ता. दौंड) येथे अडसूळ यांच्या पत्र्याच्या खोलीत राहत होते. सुरेंद्र हे परिसरात बांधकामाची कामे करत होते. मुलगा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. पत्नी गावातील शेतात मजुरीचे काम करत होती. घरा शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी नागरिकांच्यात चर्चा आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमावावा लागला. कुटुंबप्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कुटुंब या परिसरात गेल्या पाच वर्षापासून राहत आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी व विद्युत कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झाले.