नसरापूर(पुणे) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. किकवी येथे विट भट्टीवरील पाण्याची साठवण टाकी फुटली. त्यावेळी फुटलेल्या टाकीच्या भिंती खाली ३ वर्षाची चिमुकलीचा दबून मृत्यू झाला आहे. तर दुसरी १३ वर्षाची मुलगी जखमी झाली असून थोडक्यात बचावली आहे. जखमी मुलीला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना किकवी या गावच्या हद्दीतील गट नं. २१२ या शेतात गणेश भिलारे यांच्या वीटभट्टीवर १२ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास घडली.
विद्या पांगू जाधव (वय ३ वर्षे) हिचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मी गोविद वाघमारे (वय १३ वर्षे) ही जखमी झाली आहे. दोघीही राहणार किकवी, ता. भोर, जि. पुणे, मुळ राहणार कैलवल ता. माणगाव जि. रायगड येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. या प्रकरणी गणेश उर्फ ईश्वर दत्तात्रय भिलारे (वय २७ वर्षे रा. किकवी) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दोघींना विटांच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले. या घटनेची तीव्रता एवढी होती की पाण्याच्या लोंढ्याने शेजारील घराची देखील भिंत पडली आहे. या घटनेनी परिसारत हळहळ व्यक्त केली जात आहे.