अमिन मुलाणी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाईच्या (हिलाळ वस्ती) जवळ मंगळवार (दि. ७ जानेवारी) रोजी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वीच कवठे येमाईच्या इचकेवाडी जवळ दुचाकी व चारचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये दोघांचा मृत्यू होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा हा अपघात घडल्याने महामार्गावरील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याने वाहने चालवताना योग्य ती सावधानता बाळगावी लागणार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ गोपाळ जाधव (वय २५, रा. पिंपरखेड ता. शिरूर, जि. पुणे) हा तरुण रांजणगाव गणपती येथील मेडिकल दुकान बंद करून दुचाकीवर पिंपरखेड येथे निघाला होता. रात्री आठच्या सुमारास अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाईच्या (हिलाळ वस्ती) जवळ आदिनाथ जाधव यांच्या दुचाकीचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण अपघात झाला. यात आदिनाथचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अष्टविनायक महामार्ग वेगवान झाल्याने तसेच रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने येणारी- जाणारी वाहने अतिशय वेगात जात असल्याने, अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावरील धोकादायक ठिकाणावर तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून केली जात आहे.