पुणे : जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांबरोबरच आता डी.एड., बी.एड. पदवीधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. कंत्राटी तत्त्वावर ही नियुक्ती केली जाणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतूद केली आहे. परंतु, सर्वच शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच पद रिक्त राहिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे रिक्त पदावर डी.एड., बी.एड. पदवीप्राप्त बेरोजगार शिक्षकांना संधी मिळणार आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ७० वर्षे इतकी राहणार आहे. तसेच, हा शिक्षक मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असणे आवश्यक आहे. या शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी. सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील. त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार दरवर्षी नूतनीकरण करता येईल. डी.एड., बी.एड. पदवीधारक शिक्षकांना किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील.
या शिक्षकांच्या नियुक्तीचा कालावधीसुद्धा एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. दोन्ही शिक्षकांना मानधन हे १५ हजार रुपये प्रतिमहिना ठरविले आहे. यामध्ये १२ रजा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागवून आदेश द्यायचे आहेत. शाळेची पटसंख्या २० पेक्षा जास्त झाल्यास सेवानिवृत्त शिक्षक व डी.एड. आणि बी.एड. पदवीधारक शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.