-अरुण भोई
खानवटे : दौंड तालुक्यातील खानवटे येथे 15 व्या वित्त आयोगातून तीन ठिकाणी भुमिगत गटारचारीचे काम झालेले आहे. सदर कामाची जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता शासकीय गायरान गट नंबर 288 मध्ये सदरची गटारकामे केली आहेत. संबंधित निकृष्ट दर्जाच्या कामाचे मूल्यांकन देणाऱ्या उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती, दौंड यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी माजी सरपंच बबनराव धायतोंडे यांनी केली आहे.
खानवटे येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी गटार चाऱ्यांची कामे झाली असून संबंधित कामे ही गायरान गट नंबर 288 मध्ये करण्यात आली आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांची कुठलीही परवानगी न घेता व ग्रामपंचायत खानवटे यांची मालकीची जागा नसताना तसेच गटरलाईनची संपूर्ण सिमेंटची पाईप जमिनी वरती असुन इस्टिमेट प्रमाणे खोल गाढलेले नाही. त्यामुळे ती फुटण्याची दाट शक्यता आहे, आणि संबंधित पाईपलाईन ही रस्त्याच्या मधोमध गाढल्याने ती भविष्यात रस्ता झाल्यास त्याची देखभाल दुरुस्ती करता येणार नाही. तसेच, गटारचाऱ्यांच्या चेंबरची संख्या कमी व अंतर जास्त आहे, चेंबर लांब अंतरावर बांधण्यात आलेली आहेत व ती पण छोटीशी आहेत. त्यामुळे पाईपलाईन ब्लॉक होणार आहे. तसेच सदरचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून तेथील पाईपलाईन जमिनीच्या वरती आहेत. त्यामधून गटरचे पाणी व पावसाचे पाणी जाऊ शकत नाही.
तसेच सदरचे काम हे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत न करता शासकीय गायरान गट नंबर 288 मध्ये करण्यात आले आहे. जसे की सदरची जागा ही जिल्हाधिकारी पुणे यांच्या मालकीची असून संबंधित जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु कसलीही परवानगी न घेता गायरान गट नंबर मध्ये संबंधित काम करण्यात आले आहे. सदरचे निकृष्ट दर्जाचे काम असून पाईप जमिनीवर आहे. संपूर्ण पाईप फुटण्याची दाट शक्यता असताना देखील संबंधित कामाचे (मूल्यांकन) एम.बी पंचायत समितीचे शाखा अधिकारी व उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती दौंड यांनी आर्थिक देवाणघेवाण करुन (मूल्यांकन) मोजमाप केलेले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
हे काम ठेकेदाराने न करता ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी केलेले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून चुकीचे मुल्यांकन देणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच बबनराव धायतोंडे यांनी केली आहे.