पुणे : कौटुंबिक प्रॉपर्टीच्या जुन्या वादाचा राग मनात धरुन पुतण्याने काकावर धारदार चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना वडगाव शेरी येथील जावळे कॉम्प्लेक्स येथे रविवारी (ता. १९) रात्री अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मधूकर मुरलीधर राऊत (वय ३८, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी) यांनी सोमवारी (ता. २०) याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादी यांचा पुतण्या सुधीर दत्तात्रय राऊत (वय २०, रा. वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत यांचे जावळे कॉम्प्लेक्समध्ये गणेश मार्ट नावाचे किराणा दुकान आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ते दुकान बंद करत होते. त्यावेळी चुलत भावाचा मुलगा आरोपी सुधीर राऊत तेथे आला. फिर्यादी आणि त्यांच्या चुलत भावामध्ये प्रॉपर्टीचा वाद आहे. त्याने कौटुंबिक प्रॉपर्टीच्या जुन्या वादाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
दोघांमधील वाद वाढत गेल्यावर पुतण्याने काकावर सोबत आणलेल्या धारदार चाकूने सपासप वार केले. आरोपी फिर्यादी यांच्या गालावर व डोक्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी करुन पळून गेला. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.