लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुलावर सिमेंटच्या बलकरने दुचाकीवरील चुलत्या पुतण्याला ५० फूट फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी (ता.21) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत चुलता-पुतणे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सागर प्रमोद तुपे (वय 39) व पुतण्या ओम कैलास तुपे (वय 4 रा. कुंजीरवाडी, तालुका हवेली, पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघांवर हडपसरमधील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सागर तुपे व त्यांचा भाऊ कुंजीरवाडीचे माजी उपसरपंच कैलास तुपे यांचा मुलगा ओम हे दोघे गाढवे मळा परिसरातील शेतात कामानिमित्त दुचाकीवरून गेले होते. दुचाकीवरून काम आटोपून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी चालले होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला सिमेंटच्या बलकरने जोरदार धडक दिली आणि त्यांची दुचाकी तब्बल 50 फूट अंतरावर फरफटत नेली.
दरम्यान, या अपघातात चुलता पुतणे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात दाखल केले. सागर तुपे यांच्यावर मांजरी येथील योग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर ओम वर हडपसर येथील नंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ओमच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.