युनूस तांबोळी
रांजणगाव गणपती : सर, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या अन् फळं विकायला आणलीत. पपई तर खूपच गोड आहेत. स्वस्त आणि मस्त… तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, असे संभाषण करत विद्यार्थी स्वतः थाटलेल्या दुकानात खरेदी-विक्री करत होते. पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनीही वस्तू खरेदी करून खरेदीचा आनंद लुटला.
विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन तसेच व्यवहारज्ञान वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूलमध्ये बालआनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी वैज्ञानिक प्रयोग, उपक्रम, वैज्ञानिक रांगोळ्या, विज्ञान गीते, भाषणे, विज्ञान प्रदर्शन आदींचे आयोजन केले होते.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गगनभरारी’ या हस्तलिखिताचे तसेच विज्ञान विषयावर आधारित ‘द युनिव्हर्स आणि इन्वेंशन’ या हस्तलिखितांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, भाजी, फळे, कटलरी, फ्रूट ज्यूस, आईस्क्रीम या पदार्थांची विक्री करून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. विज्ञान प्रदर्शन आणि बाल आनंदमेळ्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील प्रत्यक्ष अनुभव मिळावेत, यासाठी विज्ञान दिन व बालआनंद मेळाव्याचे आयोजन केल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके यांनी सांगितले. या वेळी महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सूर्यकांत लांडे, संचालक योगेश लांडे, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूलचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब कापरे, समस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष समीर काळे, नोव्हेल प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव विनोद गव्हाणे, एंजल ग्लोबल स्कूलचे सचिव प्रमोद चव्हाण, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष दिनेश नवले, तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष कृष्णा विरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री महागणपती ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरविंद गोळे, महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे पर्यवेक्षक निलेश फापाळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अबेदा आत्तार, अक्षरनंदन गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या वंदना खेडकर, श्री महागणपती ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या पद्मिनी कवठेकर, विभाग प्रमुख सोनाली नलावडे, क्रीडा शिक्षक मच्छिंद्र खैरनार, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले. प्राचार्य अरविंद गोळे यांनी सर्वांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल सर्वांचे कौतुक केले.