इंदापूर : पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी असलेल्या वरदायिनी उजनी धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३३.५२ टक्के झाली आहे. उजनी धरणाची १ जून २०२४ रोजी पाणीपातळी वजा ५९.६७ टक्के होती. सोलापूर जिल्ह्यासाठी उन्हाळी हंगामात आवर्तन सोडले गेले होते. मागील वर्षी उजनी धरण लाभक्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे केवळ ६६ टक्के भरले होते. सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी वारेमाप पद्धतीने धरणामधून पाणी सोडल्यामुळे पाणीपातळी वजा ५९.६७ टक्के पोहोचली होती.
नर्ऋत्य मोसमी पाऊस सुरू झाला. धरण लाभक्षेत्रात पाऊस पडला. त्यामुळे काही प्रमाणात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. १० जून रोजी दौंड येथून ७९५४ क्युसेक पाण्याची आवक झाली. धरणाची पाणीपातळी वजा ५७.३१ टक्के इतकी झाली. धरणामध्ये दौंड येथून १२ हजार ५२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग येत असल्याने धरणाची पाणीपातळी १२९४.२५ दशलक्ष घनमीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरण वजा ३३.५२ टक्क्यांवर पोहोचले आहे. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील परिसरात मान्सूनचा जोर समाधानकारकरीत्या वाढलेला नाही. जोपर्यंत खडकवासला, पवना, वरसगाव, डिंबा, पानशेत आदी धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत नाही, तोपर्यंत उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत नाही. मागील एक-दोन दिवसांत उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात मान्सून पावसाने काही प्रमाणात दिलासा दिलेला आहे.